Maharastra today news
Crime news सराईत आरोपी दत्ता शिंदे दोन वर्षांसाठी तडीपार
प्रतिनिधी:राम कांबळे
दौंड : यवत पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत आरोपी दत्ता अशोक शिंदे (वय २९, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने यवत पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता शिंदे याच्याविरुद्ध विविध प्रकारचे एकूण १९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. त्याच्याकडून परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५६(१)(ब) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
सदर प्रस्ताव मा. उपविभागीय अधिकारी, दौंड उपविभाग यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर यवत पोलिसांनी दत्ता शिंदे याच्यावर तडीपारीच्या आदेशाची बजावणी केली.
त्यानुसार दत्ता शिंदे याला पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी-चिंचवडसह) तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यांच्या हद्दीतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार महेश बनकर तसेच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संदिप देवकर, रॉकी देवकाते, महेंद्र चांदणे, धीरज जाधव, प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, मारुती बाराते, सचिन गुंड, दिनेश लोणकर व विनित कुऱ्हाडे यांनी ही कारवाई केली.
