महाराष्ट्र टुडे न्यूज,,,
बारामती | प्रतिनिधी,,,,
बारामती तालुक्यातील सुपे गावात आगामी पंचायत समिती गण क्रमांक ११९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गावातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रमुख पक्षांकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरी, नागरिकांनी पक्षीय राजकारणाला छेद देत अपक्ष उमेदवाराला पसंती दिल्याने सुपे गावात राजकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे.
दोन्ही पक्षांकडून जोरदार गाठीभेटी, बैठका आणि प्रचार सुरू असतानाच गावात अपेक्षित उमेदवारांच्या नावांवर चर्चा रंगली आहे. मात्र केवळ पक्षाच्या नावावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपेक्षा काम करणारा, विश्वासार्ह आणि जनतेशी थेट जोडलेला उमेदवार हवा, अशी ठाम भूमिका ग्रामस्थ घेताना दिसत आहेत.
👉 या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आता सुपे गावाच्या माजी बिनविरोध सरपंच सौ. मनीषा हनुमंत चांदगुडे यांचे नाव ठळकपणे पुढे आले असून, त्यांनी पंचायत समिती गण क्रमांक ११९ मधून अपक्ष उमेदवार म्हणून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे.
सौ. मनीषा चांदगुडे या यापूर्वी बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात गावातील अनेक विकासकामे मार्गी लागली. विशेषतः महिलांसाठी पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, महिलांचे सामाजिक प्रश्न, बचतगटांचे बळकटीकरण तसेच अनेक प्रलंबित समस्या त्यांनी यशस्वीपणे सोडविल्या, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. त्यांच्या कामामुळे महिलावर्गात त्यांच्याबाबत मोठा विश्वास निर्माण झाला होता.
महत्त्वाचे म्हणजे, सौ. मनीषा हनुमंत चांदगुडे यांचे पतीही विविध सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहिले आहेत. सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनहिताच्या कामांमधील त्यांचा सक्रिय सहभाग सर्वपरिचित असून, त्यांचा सुपे व परिसरात मोठा जनसंपर्क आहे. या दांडग्या संपर्कामुळे चांदगुडे कुटुंबाबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, सौ. मनीषा चांदगुडे यांच्या उमेदवारीमागे प्रचंड जनमत उभे राहत असल्याची चर्चा आहे.
पक्षाने उमेदवार दिला असला तरी, नागरिकांनी पक्ष न पाहता व्यक्ती, काम आणि अनुभवाला प्राधान्य दिल्याचे चित्र सध्या सुपे गावात स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळेच अपक्ष उमेदवार असतानाही सौ. मनीषा चांदगुडे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे.
यावेळी बोलताना सौ. मनीषा हनुमंत चांदगुडे म्हणाल्या,
👉 “मी बिनविरोध सरपंच म्हणून काम करताना जनतेचा विश्वास जिंकला आहे. विकासकामे, महिलांचे प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे ध्येय राहिले आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर मी आज पंचायत समिती गण क्रमांक ११९ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. जनता माझ्या कामाची नक्कीच दखल घेऊन मला पसंती देईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे पक्षीय उमेदवार रिंगणात असतानाच दुसरीकडे अपक्ष उमेदवाराला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता, सुपे व परिसरातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच ही लढत पक्ष विरुद्ध व्यक्ती नव्हे, तर राजकारण विरुद्ध विश्वास अशी होताना दिसत असून, सौ. मनीषा हनुमंत चांदगुडे यांची अपक्ष उमेदवारी ही या निवडणुकीतील निर्णायक टप्पा ठरण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
