Maharashtra today news,,
विद्युत रोहित्र चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक
१६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; चाकण दक्षिण व आळंदी पोलिस ठाण्यातील सात गुन्हे उघड
पिंपरी-चिंचवड : आळंदी व चाकण परिसरात विद्युत रोहित्र (डीपी) चोरी करून त्यातील तांबे व ॲल्युमिनियम धातू विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा, युनिट-३ च्या पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चाकण दक्षिण पोलिस ठाण्यातील तीन आणि आळंदी पोलिस ठाण्यातील चार, असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हे शाखा, युनिट-३ मधील पोलिस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांना आळंदी व चाकण परिसरातील विद्युत रोहित्र चोरीप्रकरणी महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली होती. चोरी केलेल्या रोहित्रांमधील तांबे व ॲल्युमिनियम विक्रीसाठी आरोपी कोयाळी, ता. खेड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला.
या कारवाईत अक्षय बाबासाहेब काळे (वय ३४) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने राहुल दिनकर पोकळे (वय २०) व नेपाळी उर्फ ललित मगर यांच्या साथीने विद्युत रोहित्र चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेल्या रोहित्रांमधील कॉपर व ॲल्युमिनियम धातू कोयाळी परिसरातील भंगार व्यावसायिकांना विकल्याचेही चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.
त्यानंतर पोलिसांनी इजहार इस्माईल चौधरी (वय ४०) आणि ब्रिज मोहन असर्फीलाल प्रजापती (वय ३०) यांना ताब्यात घेतले. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली वाहने तसेच चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमाल
५१० किलो कॉपर व ॲल्युमिनियम धातू – ५ लाख १० हजार रुपये
इको चारचाकी – ५ लाख ५५ हजार रुपये
पिकअप वाहन – ५ लाख १५ हजार रुपये
मोटारसायकल – ५५ हजार रुपये
एकूण जप्त मुद्देमाल : १६ लाख ३५ हजार रुपये.
सात गुन्हे उघड
या कारवाईत चाकण दक्षिण पोलिस ठाण्यातील गुन्हे क्रमांक ७९/२०२६, १३/२०२६ आणि १८/२०२६, तसेच आळंदी पोलिस ठाण्यातील गुन्हे क्रमांक ५६३/२०२५, २२६/२०२५, ११३/२०२५ आणि ८६/२०२६ असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अक्षय काळे, राहुल पोकळे, ब्रिज मोहन प्रजापती आणि इजहार चौधरी यांचा समावेश आहे. नेपाळी उर्फ ललित मगर हा आरोपी अद्याप पाहिजे असून त्याचा पूर्ण पत्ता उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी आळंदी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गरजे, बिराजदार, बोराडे, भोसुरे तसेच पोलिस अंमलदार खेडकर, गोंटे, रुपनवर, महाले, भांगले, फापाळे आणि गुंजाळ यांच्या पथकाने केली.
