“DJच्या दणदणाटावरून पुणे पोलीस आयुक्त हायकोर्टात! अमितेश कुमार यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल”
Maharashtra today news
न्यायालयाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी न केल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप; DJ, लाऊडस्पीकर आणि बार-पबच्या आवाजाचाही मुद्दा ऐरणीवर
पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ध्वनिप्रदूषण नियंत्रणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत अमितेश कुमार यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
ही याचिका २७ ऑगस्ट २०२६ रोजी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा सीएचएस अँड अपार्टमेंट्स फेडरेशन, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, श्री स्वामी समर्थ सहकारी संस्था तसेच ज्येष्ठ नागरिक विलास लेले यांच्यासह याचिकाकर्त्यांनी ही कारवाई केली आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा दावा
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने २० ऑगस्ट २०२४ रोजी जनहित याचिका क्रमांक १९१/२०२३ मध्ये ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी काही स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र पुणे शहरात या निर्देशांची अपेक्षित प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
गणेशोत्सव, ईदसह विविध धार्मिक सण, राजकीय सभा, मिरवणुका तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील DJ, ध्वनिक्षेपक आणि इतर ध्वनी यंत्रणांचा वापर होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
बार-पबच्या आवाजाचाही मुद्दा
ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न केवळ सण-उत्सवांपुरता मर्यादित नसल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. निवासी भागातील बार, पब, रेस्टॉरंट आणि मनोरंजन केंद्रांमधून होणाऱ्या मोठ्या आवाजाचाही याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे.
“DJच्या दणदणाटावरून पुणे पोलीस आयुक्त हायकोर्टात! अमितेश कुमार यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल”
अतिरिक्त आवाजामुळे नागरिकांच्या शांततेवर आणि झोपेच्या अधिकारावर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्तांचे म्हणणे काय?
दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पोलिसांकडून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले. गणेश मंडळांशी चर्चा सुरू असून, ध्वनीची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ईदच्या मिरवणुकीदरम्यान सहा प्लाझ्मा साउंड सिस्टिम जप्त केल्याचे तसेच १४८ मंडळांवर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
