Maharashtra today news
आढले बुद्रुक येथे साई संतोष कदम यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
आदर्श शिक्षकांचा सन्मान; कर्मवीर विद्यालयाच्या १०० टक्के निकालाबद्दल शिक्षकांचा गौरवआढले बुद्रुक : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आढले बुद्रुक येथे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच संतोष कदम यांच्या वतीने साई संतोष कदम यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना देशाचे खरे आधारस्तंभ मानून शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा, शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि संत विचारांतून संस्कारक्षम पिढी घडावी, या उद्देशाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कर्मवीर विद्यालय, आढले बुद्रुक या विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला. याबद्दल विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सलमा दिलावर मुल्ला, ज्येष्ठ शिक्षक सुशीलकुमार कांबळे, मनोज पवार, हसन शिकलगार, विठ्ठल दळवी आणि मुकुंद वाघमारे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.संत साहित्य व संस्कृतीचा जागर
महाराष्ट्राची खरी अस्मिता जपत दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी दिंडी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना साहित्य व संस्कृतीची गोडी लागावी, संत विचारांतून महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कारांची जडणघडण व्हावी, तसेच संत साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
भारत गौरव पुरस्कार प्राप्त कविवर्य विठ्ठल दळवी यांनी संत विचारांतून महाराष्ट्र घडावा, संत साहित्याचा मार्ग स्वीकारावा, झाकलेला इतिहास समोर यावा आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा, अशा विविध विषयांवर आपले विचार मांडले. संत साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.दळवी यांनी विविध विषयांवर कविता सादर करून विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण केली असून साहित्य संमेलनांमध्येही आपले विचार मांडले आहेत. दिल्ली येथे संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारून संत साहित्याची महानता अधोरेखित केल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
"संत विचारांशिवाय विश्वाला पर्याय नाही" हा संदेश देत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीसह संत साहित्याची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदाताई घोटकुले, उपसरपंच संतोष कदम, सदस्य वंदना घोटकुले, अश्विनी वाघमारे, सुरेश घोटकुले, आकाश घोटकुले, खंडू वाघमारे, अरुण वाघमारे, पल्लवी वाघमारे, जयश्री घोटकुले, नितीन साळुंके, तानाजी घोटकुले, तसेच सरपंच मछिंद्र म्हस्के, प्रियंका घोटकुले आदी उपस्थित होते.