महाराष्ट्र टुडे न्यूज
संतोष पंडितच्या अडचणीत वाढ; १४ दिवस न्यायालयीन कोठडीत
पुणे : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून वादग्रस्त चित्रफीत प्रसारित केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले युट्यूबर संतोष गजानन पंडित यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी (८ सप्टेंबर) पंडित यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान पंडित यांनी वादग्रस्त चित्रफीत तयार करण्यासाठी वापरलेला मोबाइल संच, सिमकार्ड आणि ट्रायपॉड जप्त केला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रकरणातील डिजिटल पुरावे तसेच संबंधित महिला साक्षीदारांची चौकशी करणे बाकी आहे. तपास पूर्ण करून आवश्यक पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली होती.
न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत संतोष पंडित यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलिसांकडून सुरू असून, पंडित यांच्यावरील आरोपांचा तपास कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू आहे.
