Maharashtra today news
Crime newsशाळेत शासकीय नोंदणी सुरू असताना रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी; कुर्डूवाडीत खळबळ
चिंचगाव प्रतिनिधी : नागेश पाटील
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील गवळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एसआयआर २०२६ नोंदणीचे शासकीय काम सुरू असताना एका व्यक्तीने रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे गवळेवाडी परिसरासह माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास गवळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एसआयआर २०२६ नोंदणीचे काम सुरू होते. या प्रक्रियेसाठी गावातील नागरिक पोपट भानुदास गवळी हे शाळेत उपस्थित होते.
याचदरम्यान गावातील राजकुमार कल्याण गवळी (वय ३२, रा. गवळेवाडी, ता. माढा) हा तेथे आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशिष्ट व्यक्तींच्या नावांच्या नोंदणीवरून त्याने आक्षेप घेत पोपट गवळी यांच्याशी वाद घातला.
तक्रारीनुसार, आरोपीने मोठ्या आवाजात आरडाओरड करत, “तू पोपट गवळी, बाबू सरडे आणि वंदना पोपट सरडे यांची नावे कशी नोंदवतो, ते मी बघतो,” असा दम दिल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपीने जवळील रिव्हॉल्वर काढून पोपट गवळी यांच्या डोक्याला लावल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात हा प्रकार घडल्याने काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडे असलेल्या शस्त्राचा परवाना आहे की नाही, तसेच शस्त्राचा वापर कशासाठी करण्यात आला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
