Maharashtra today news
Crime news:शाळेतच मृत्यूचा थरार! विद्यार्थ्याच्या गोळीबारात ७ जणांचा बळी, २० जखमी
बँकॉक : थायलंडमधील नॉन्थाबुरी प्रांतातील बँग क्रुआई जिल्ह्यातील देबसिरिन नॉन्थाबुरी शाळेत शुक्रवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. एका विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरात अचानक गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एका शिक्षकासह सात जणांचा मृत्यू, तर सुमारे २० जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विद्यार्थी शाळेच्या परिसरात आला आणि त्याने अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. नॉन्थाबुरी प्रांतातील पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिल्याचे वृत्त आहे.
जखमींमध्ये एक शिक्षक आणि तीन विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनेनंतर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पोलिसांनी आणि बचाव पथकाने मोहीम राबवली. काही विद्यार्थी शाळेच्या परिसरात अडकून राहिल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळावरील व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
