Maharashtra today news
Crime news,गावठी कट्ट्याच्या जोरावर भाईगिरी; अवघ्या दोन तासांत यवत पोलिसांनी केली अटक
यवत, प्रतिनिधी : राम कांबळे,
चौफुला परिसरात गावठी पिस्टलचा धाक दाखवून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना यवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून त्यांच्याकडून एक अवैध गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
दि. १२ जून २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मौजे बोरीपार्धी (ता. दौंड, जि. पुणे) येथील रेणुका कलाकेंद्रात मयूर दत्तू पाटील (वय २६) व पवन कल्लू बर्मी (वय २१, दोघेही रा. पिंपळवाडी रोड, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगून सोमनाथ छगन माने (वय ३०, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे) यांना शस्त्राचा धाक दाखवत शिवीगाळ व दमदाटी केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकरणी सोमनाथ माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५२, ३५१(२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांचा तात्काळ शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत जेरबंद केले.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले अवैध गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, पोलीस हवालदार परशुराम म्हस्के, मेघराज जगताप, संदीप करे, किशोर मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल प्रतिक धिवार व दादा जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
