Maharashtra today news
Crimenewsवरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांची करडी नजर; खंडणीखोर टोळीला बेड्या
पुणे : वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षामधील प्रवाशाला मारहाण करून त्याच्या पत्नीकडून ऑनलाईन २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चार जणांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व खंडणीतील १० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी फिर्यादी धनिष कुमार हेरेंद्र प्रसाद (वय २२, व्यवसाय सेंट्रींग काम, मूळ रा. बिहार) व त्यांचे मित्र सत्येंद्र महतो (वय ४१, रा. बिहार) यांना रिक्षामधील चार अनोळखी इसमांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या पत्नीकडून ऑनलाईन २५,००० रुपये मागवून घेतले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ४०/२०२६ भा. न्याय संहिता कलम ३०८ (५), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा गुलटेकडी परिसरात शोध घेतला. त्यानुसार गणेश आण्णा जगधने (वय २९) व अमोल उत्तम गायकवाड (वय ३२, दोघे रा. डायस प्लॉट कॅनॉल, गुलटेकडी, पुणे) यांना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तपासादरम्यान त्यांच्या साथीदारांची माहिती मिळाल्यानंतर अतुल रविंद्र गायकवाड (वय ३८) व संतोष राधाकिशन सरोदे (वय ३१, दोघे रा. गुलटेकडी, पुणे) यांना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने सर्व आरोपींना २ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे तसेच पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता व त्यांच्या पथकाने केली आहे.
