हडपसर पोलिसांची कारवाई
Maharashtra today news,,
Crime newsपहाटेच्या प्रवासात घडला विनयभंग; २४ तासांत पोलिसांकडून चार्जशीट दाखल
पुणे प्रतिनिधी राम कांबळे,,,
पुणे : हैदराबादहून पुण्याकडे येणाऱ्या खासगी प्रवासी वाहनात महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत २४ तासांच्या आत आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता काचीगुडा (हैदराबाद) येथून हडपसर (पुणे) येथे येणाऱ्या श्री गणेश ट्रॅव्हल्स (वाहन क्रमांक AR-01/TR-8969) या खासगी बसमध्ये सदर महिला आपल्या पतीसह स्लीपर सीटवरून प्रवास करत होती. दरम्यान, आरोपी निशीतकुमार यशवंत सिंग (वय ४७, रा. अपना घर सोसायटी, मिरा रोड, मुंबई) याने १० फेब्रुवारी रोजी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान वारंवार महिलेच्या अंगास स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा करण्यात आला असून, पीडितेकडील मोबाईलमध्ये घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण असल्याने तो पुरावा पेनड्राईव्हमध्ये उतरवून जप्त करण्यात आला आहे. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदवून संबंधित ट्रॅव्हल्समधील प्रवासी यादीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार व त्यांच्या पथकाने तपास करून आरोपीस १० फेब्रुवारी रोजी अटक केली. विशेष म्हणजे, हडपसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
