Maharashtra today news
प्रतिनिधी,, सुजाता सरेकर,
डोंबिवली–कल्याणात बेकायदेशीर वास्तव्य; आठ बांग्लादेशी नागरिकांना नऊ महिन्यांचा तुरुंगवास
कल्याण – डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर परिसरात कोणतीही कागदपत्रे नसताना बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या आठ बांग्लादेशी नागरिकांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी नऊ महिन्यांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकावर ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विदेशी वास्तव्य कायद्याचे उल्लंघन
आरोपींनी स्थलांतर आणि विदेशी रहिवास कायदा, १९४६ तसेच विदेशी वास्तव्य कायद्याचे उल्लंघन केले होते. त्यांच्या ताब्यात भारतात राहण्याचे कोणतेही अधिकृत पुरावे आढळून आले नाहीत.
शिक्षा पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना बांग्लादेशात परत पाठविण्याचे निर्देश न्यायालयाने तुरुंग अधीक्षक आणि स्थानिक पोलिसांना दिले आहेत.
मागील दीड वर्षात ५० हून अधिक बांग्लादेशी अटकेत
गेल्या दीड वर्षात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर पोलिसांनी आणि कल्याण गुन्हे शाखेने ५० पेक्षा अधिक बांग्लादेशी नागरिकांना आपल्या हद्दीतून अटक केली आहे. काही महिला, पुरुष नागरिक झोपड्या, बेकायदा चाळ्या, वस्ती भागांमध्ये राहत होते.
स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार निवासस्थानी छापे टाकून त्यांना ताब्यात घेतले. काहींकडे बनावट आधारकार्ड, तर काहींकडे त्यांचे बांग्लादेशी असल्याचे पुरावे मिळाले.
रोखठोक पुरावे नसलेले आरोपी
पोलिसांच्या चौकशीत आरोपी बारमध्ये काम, वाहन दुरुस्ती कार्यशाळा, रंगारी काम व सौंदर्यप्रसाधन व्यवसाय अशा ठिकाणी काम करत असल्याचे समोर आले.त्यांच्यावर स्थलांतर आणि विदेशी वास्तव्य कायद्यानुसार गुन्हे दाखल करून प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने घेतला मानवतावादी दृष्टिकोन
न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, आरोपी हे दुर्बल, गरीब आणि अज्ञानी असून भारतात कसे आले, याचे सबळ पुरावे ते देऊ शकले नाहीत. त्यांच्या परिस्थितीचा विचार करून दिलेली शिक्षा पुरेशी व मानवतावादी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
शिक्षा ठोठावण्यात आलेले आरोपी
मोन्या मस्जिद सरदार (३७) – डोंबिवली
अमिना जहांगिर गाझी (२२) – डोंबिवली
शेहनाझ मोहम्मद अली सरदार (४४) – डोंबिवली
नर्गिस मोहम्मद सरदार (३२) – डिझायनर, डोंबिवली
मजिदा रसुल शेख (३५) – कल्याण
मोहम्मद शांतु युनुस मुल्ला (३०) – कल्याण
सुमी मोहम्मद शांतु मुल्ला (२८) – चेहरा सौंदर्यप्रसाधन व्यवसाय
नूर महम्मूद पठाण – उल्हासनगर
तौकीर मोहम्मद आलम हा आरोपी फरार असल्याने त्याचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.
