LCB लातूरची धडक कारवाई — ₹५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कार जप्त, एक आरोपी अटक
लातूर जिल्ह्यात वाढत्या अवैध गुटखा व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ₹५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक १९ नोव्हेंबर रोजी पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की रोहिणा–बोथी रोडमार्गे पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे.
या माहितीवरून LCB पथकाने बोथी तांडा–रोहिणा रोडवर सापळा रचला आणि सायंकाळी ५.५५ वाजता संशयित कार (MH 05 AX 9610) अडवली. तपासणीदरम्यान कारच्या डिक्कीमध्ये आणि मागील सीटखाली पांढऱ्या व खाकी पिशव्यांमध्ये विमल पान मसाला, V-1 तंबाखू असा मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
गुटख्याची किंमत ₹१,२०,०००/- तर स्विफ्ट डिझायर कारची किंमत ₹४,००,०००/- असून, एकूण ₹५,२०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत अभय दिनेश सोळंके (वय ३०, रा. मुंगी, ता. धारूर, जि. बीड) यास ताब्यात घेतले असून तो अवैध व्यापारासाठी प्रतिबंधित गुटखा वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्याच्यावर BNS कलम 123, 274, 205, 223 अन्वये चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत PSI प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सुर्यकांत कलमे, पाराजी पुठेवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ही कारवाई अवैध व्यावसायिकांना कठोर संदेश देणारी ठरली आहे.
