प्रतिनिधी अमोल धेंडे
सारसबागेतील लाडक्या बाप्पाला लोकरीचा स्वेटर आणि कानटोपी; भक्तांच्या उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक
महाराष्ट्र टुडे न्यूज
Maharashtra today news
पुणे : शहरातील श्रद्धेचं प्रमुख केंद्र असलेल्या सारसबाग गणपतीला थंडीच्या लाटेचा फटका बसू नये म्हणून भक्तांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला विशेष तयार केलेला लोकरीचा स्वेटर आणि कानटोपी परिधान करण्यात आली असून, ही दृश्ये पाहण्यासाठी भक्तांची गर्दी उसळली आहे.
भगवंतावरील प्रेमातून शिवणकलेत पारंगत असलेल्या काही भक्तांनी रात्रीच हा स्वेटर आणि टोपी तयार करून मंदिरात अर्पण केली. सकाळी बाप्पाला हा उबदार पोशाख घातल्याचे दृश्य पाहून भाविकांनी आनंद व्यक्त केला.
मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले की,"अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे अनेक भक्तांनी अशी कल्पना मांडली. बाप्पाला उबदार ठेवण्यासाठी बनवलेला स्वेटर आणि कानटोपी हा भक्तीभावाचा सुंदर नमुना आहे."
या अनोख्या उपक्रमामुळे सोशल मीडियावरही “सारसबाग बाप्पाचा विंटर लूक” मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, पुणेकरांकडून याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
भक्तीभाव, उबदार भावना आणि कल्पकता यांचा सुंदर संगम असलेली ही घटना सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
महाराष्ट्र टुडे न्यूज
