ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

फुरसुंगीतील निवारागृह कर्मचाऱ्याची आत्महत्या; संस्थाचालकावर मानसिक छळाचे गंभीर आरोप

 


Maharashtra today news,,

फुरसुंगीतील निवारागृह कर्मचाऱ्याची आत्महत्या; संस्थाचालकावर मानसिक छळाचे गंभीर आरोप

पुणे, प्रतिनिधी : फुरसुंगी येथील एका खुले निवारागृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत कर्मचाऱ्याने लिहून ठेवलेल्या कथित सुसाईड नोटच्या आधारे संस्थाचालकावर मानसिक छळ, धमकावणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील वडले येथील रहिवासी अतुल अंकुश लाळगे (वय २६) हे गेल्या अडीच वर्षांपासून फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्था संचालित खुले निवारागृहात कार्यरत होते. २२ जून रोजी दुपारी त्यांनी कामाच्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण "डेथ ड्यू टू हँगिंग" असे नमूद करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ अनिकेत लहुदास लाळगे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, अतुल यांनी लिहून ठेवलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अतुल यांना कमी पगारात अधिक काम करण्यास भाग पाडले जात होते. संस्थेत आवश्यक कर्मचारी संख्या नसतानाही अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकण्यात आल्या होत्या. संस्थेतील विविध घटनांची जबाबदारी त्यांच्यावर ढकलली जात होती. तसेच नोकरी सोडण्याचा प्रयत्न केल्यास करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे, वारंवार शिवीगाळ करणे आणि मानसिक दबाव निर्माण करणे असे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, अतुल यांची नियुक्ती सोशल वर्कर म्हणून करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून समन्वयकाची जबाबदारीही सांभाळून घेतली जात होती. बालकांचे संगोपन, कार्यालयीन कामकाज, विविध नोंदवह्यांची पूर्तता, इतर संस्थांची कागदपत्रे, वैयक्तिक व घरगुती कामे, डबे पोहोचविणे तसेच इतर विविध कामांचा अतिरिक्त भार त्यांच्यावर टाकण्यात आल्याचा आरोप आहे.

तसेच संस्थेमध्ये घडणाऱ्या विविध घटनांसाठी, बालके पळून जाण्याच्या प्रकारांसाठी किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या चुकांसाठीही अतुल यांनाच जबाबदार धरले जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी संस्थेतील एका बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याची जबाबदारीदेखील अतुल यांच्यावर टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कथित सुसाईड नोटमध्ये संस्थेतील काही गंभीर गैरप्रकार, बालकांच्या संगोपनासंदर्भातील बाबी तसेच आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संस्थेत आवश्यक कर्मचारी नसताना कामकाज चालविणे, नोंदवहींमध्ये कथित चुकीच्या नोंदी करणे, वेळेवर वेतन न देणे आणि इतर प्रशासकीय त्रुटींचाही उल्लेख नोटमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, संस्थेतील कामकाज किंवा कथित गैरप्रकारांबाबत कुणालाही माहिती दिल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही नोटमध्ये असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

आत्महत्येपूर्वी अतुल यांनी आपल्या बहिणीसह कुटुंबीयांकडे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली होती, असे नातेवाईकांनी सांगितले. वाढता कामाचा ताण, कमी वेतन, सततचा मानसिक दबाव आणि वरिष्ठांकडून होणारा कथित छळ यामुळे ते नैराश्यात गेले होते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या सर्व प्रकाराला कंटाळून अतुल लाळगे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. तसेच कथित सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संस्थेच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून सत्य बाहेर आणावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |