Maharashtra today news
सुपे येथे MDR-61 रस्ते कामामुळे पाणीपुरवठा खंडित; ग्रामस्थांकडून हंडा मोर्चा काढू म्हणून ग्रामपंचायतीला निवेदन!
सुपे (ता. बारामती) प्रतिनिधी : अमोल धेंडे
सासवड-सुपे-भिगवण (MDR-61) रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे सुपे गावातील पिण्याच्या पाण्याची मुख्य वाहिनी आणि सांडपाणी वाहिनी तुटल्याने गावातील विशेषतः दलित वस्तीत पाणीपुरवठा खंडित झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
सुपे येथील सुयश सुनिल जगताप यांनी ग्रामस्थांच्या सह्यांसह हे निवेदन ग्रामपंचायत सुपेचे ग्रामसेवक व प्रशासनाला सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, सासवड-सुपे-भिगवण (MDR-61) रस्त्याचे काम MSIDC मार्फत कंत्राटदार कडून सुरू असताना खोदकामादरम्यान पिण्याच्या पाण्याची मुख्य लाईन तसेच भूमिगत गटारे तुटली आहेत.
निवेदनानुसार, रस्ते कामाच्या खोदकामामुळे लोकवस्ती गावठाण आणि आसपासच्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला असून यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. टॅंकर द्वारे पाणी पुरवठा सुरू असून पिणेयोग्य पाणी नळ पाणी पुरवठा योजने अंतर्गत च करावा तसेच पिण्याच्या पाण्याची लाईन आणि सांडपाणी वाहिनी एकाच ठिकाणी फुटल्याने दूषित पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची तातडीने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून पंचनामा करावा, आणि गावाचा पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, ग्रामसेवकांनी निवेदन स्वीकारून लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्याची माहिती सुयश जगताप यांनी दिली.
