Maharashtra today news
महाराष्ट्र टुडे न्युज
मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीत पुन्हा एकदा धुराळा उडाला आहे. शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केल्यानंतर, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मित्रपक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देण्याच्या घडामोडींमुळे शिंदे गटातील काही मंत्री संतप्त असल्याचे समोर आले आहे. या नाराजीची झळ थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला बसली. काही मंत्र्यांनी बैठक बहिष्कृत करताच राज्यातील राजकीय वातावरणात चांगलाच खडबडाट निर्माण झाला.
याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून शिंदेंना उद्देशून टीका करत म्हटले—
“आज परत कोणीतरी गावी जाणार… मंत्री मंडळाच्या बैठका जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. पण यांच्यासाठी स्वार्थच मोठा!”
त्यांच्यानुसार, मंत्र्यांचा राग हा भाजपवर आणि स्वगटावरच अधिक आहे. निवडणुकीतील जागावाटप, पक्षात घडणारी फोडाफोड आणि अंतर्गत नाराजी यामुळे शिंदे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी सूचवले.
दरम्यान, महायुतीतील या नाराजीमुळे आगामी निवडणुकांपूर्वी सत्ता समीकरणात नवे उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.
