सुपे गावात बेकायदेशीर दारू विक्रीचा सुळसुळाट — प्रशासनाकडून कारवाईचा अभाव, नागरिकांचा सवाल : जबाबदार कोण?”
सुपे प्रतिनिधी फिरोज मोगल,,,
बारामती तालुका | दि. १२ नोव्हेंबर २०२५
बारामती तालुक्यातील सुपे गावात गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
गावातील मार्केट यार्डच्या पाठीमागील भागात हा अवैध धंदा दिवसाढवळ्या सुरू असून, प्रशासन व पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.
नागरिकांचा सवाल आहे — “इतका मोठा अवैध धंदा सुरू असताना संबंधित यंत्रणा निष्क्रिय का? गावात रोज नशेमुळे भांडणे, कौटुंबिक वाद, आणि गुन्हे वाढत आहेत; तरी कारवाई का नाही?”
स्थानिकांनी प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या असून, तरीही परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. त्यामुळे या दुर्लक्षामागे काही मोठा आर्थिक स्वार्थ किंवा शिथिल यंत्रणा आहे का, असा जनतेतून सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी आता जिल्हा प्रशासन व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून, बेकायदेशीर दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.
