दिनांक ३ ते 4 नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे अहमदपूर तालुक्यातील रुद्धा शिवारात स्वतःच्या शेतीतील आखाड्यावर शिवराज निवृत्ती सुरनर (वय ७० वर्षे) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर (वय २० वर्षे) या दोघांचा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून खून केला असल्याची माहिती अहमदपूर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली.
सदर घटनेची गंभीर दखल घेऊन अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
खुनाचा तपास वेगाने आणि काटेकोरपणे करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर श्री. रायबोले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांचे संयुक्त पथक नेमण्यात आले.
पथकाने गुन्ह्याचे स्वरूप, घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब, आणि मृत व्यक्तींशी असलेल्या वैयक्तिक वादांचा बारकाईने अभ्यास केला. तपासादरम्यान जमिनीच्या वादातून ही दुर्दैवी घटना घडल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान संशयितांवर लक्ष केंद्रित करून पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि जलद हालचालीत अवघ्या आठ तासांत खालील दोघा आरोपींना अटक केली —
1️⃣ नरसिंग भाऊराव शिंदे (वय ६० वर्षे)
2️⃣ केरबा नरसिंग शिंदे (वय २३ वर्षे)
(दोघे रा. करेवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) असे असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, आरोपींना पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रायबोले यांच्या नेतृत्वात संयुक्त पथकातील पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार, सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, संतोष केदासे, पो.उ.नि. राजेश घाडगे, प्रमोद देशमुख, तसेच पोलीस अंमलदार संजय कांबळे, रामलिंग शिंदे, साहेबराव हाके, अर्जुन राजपुत, दिनानाथ देवकते, युवराज गिरी, माधव बिलापटटे, नवनाथ हासबे, राजेश कचे, तुराब पठाण, मुन्ना मदने, जमीर शेख, पाराजी पुठठेवाड, तुळशीराम बरुरे, राहुल काबळे, शैलेश सुडे, गणेश साठे, व्यंकटेश निदुरे, श्रीनिवास जांभळे तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील तानाजी आरदवाड, विशाल सारुळे, कांबळवाड, महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड आदींचा समावेश होता.
“अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी दाखविलेली वेगवान व परिणामकारक कार्यवाही उल्लेखनीय आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जातील,” असे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी सांगितले.