Maharashtra today news
Categories: Crime News, Latur District, Police Action, Jewellery Theft, Maharashtra Crime, Investigation Update
Tags: Latur Police, Jewellery Theft, Silver Ornaments Seized, Gold Theft, Roshan Singh Tak, Local Crime Branch, SP Amol Tambe, ASP Mangesh Chavan, PI Sudhakar Bavkar, Ahmedpur Police Station, MIDC Latur, Kasar Shirshi, Burglary Case, Crime Investigation, 24 Lakh Seizure, Bank of Maharashtra Theft, Amit Jewellers, Vitthal Jewellers, Vishwakarma Jeweller
लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या ज्वेलरी दुकाने, बँक आणि घरफोड्यांच्या मालिकेमागील सराईत गुन्हेगार टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एका आरोपीला अटक करत त्याच्याकडून तब्बल 13 किलो 700 ग्रॅम चांदी व सोन्याचे दागिने, असा ₹24,17,900 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. टोळीतील आणखी चार आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे 30 नोव्हेंबर रोजी नवीन रेणापूर नाका परिसरात सापळा लावण्यात आला. यावेळी संशयास्पदरीत्या उभा असलेल्या रोशनसिंग बबलुसिंग टाक (वय 20, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात चांदी व सोन्याचे दागिने आढळून आले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने आणि त्याच्या चार साथीदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीने कबूल केल्याप्रमाणे, या टोळीने अहमदपुरातील अमित ज्वेलर्स व विठ्ठल ज्वेलर्स, काजळी हिप्परगा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, अहमदपुरातील एक घर, आणि मदनसुरी येथील विश्वकर्मा ज्वेलर्स अशा एकूण पाच ठिकाणी चोऱ्या केल्या. चोरलेले सोन्याचे दागिने लातूरमधील एका ज्वेलर्स दुकानात विक्री केल्याची माहितीही आरोपीने दिली.
या टोळीमुळे अहमदपूर पोलीस ठाण्यातील तीन घरफोडी आणि कासार शिरशी व एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. अटक आरोपी रोशनसिंग टाक यास जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस ठाणे अहमदपूर येथील गु. र. नं. 618/2025 मध्ये पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकामध्ये सपोनि सदानंद भुजबळ, अमितकुमार पुणेकर, पोउपनि राजाभाऊ घाडगे, प्रमोद देशमुख, तसेच अन्य पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता.
