डॉ. सुरेश खटावकर यांचे दुःखद निधन; सुपे परिसरातील आरोग्यसेवेचा आधारवड हरपला
प्रतिनिधी फिरोज मोगल
सुपे परिसरातील आरोग्यसेवेचे आधारस्तंभ आणि जनसामान्यांचे लाडके चिकित्सक डॉ. सुरेश खटावकर यांचे दुःखद निधन झाले आहे. गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असताना त्यांनी आपल्या अविरत सेवेमुळे संपूर्ण सुपे आणि परिसरातील रुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून काम केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील मलकापूर हे मूळ गाव असलेले डॉ. खटावकर यांनी बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून MBBS पदवी संपादन केली. खाजगी वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या त्या काळात गुणांच्या जोरावर मिळवलेला हा प्रवेश त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची साक्ष देणारा होता.
डॉ. खटावकर यांची खासियत म्हणजे अचूक निदान. रुग्णाचा आजार अचूक ओळखून उपचार देणे किंवा आवश्यक असल्यास संबंधित तज्ज्ञांकडे मार्गदर्शन करणे—त्यांनी नेहमीच रुग्णसेवा हाच केंद्रबिंदू ठेऊन काम केले. रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवणे, हे त्यांचे अतिशय कौतुकास्पद वैशिष्ट्य होते.
त्या काळात संपूर्ण सुपे गावात फक्त दोन महिंद्रा जीप होत्या—एक सरकारी दवाखान्याकडे आणि दुसरी डॉ. खटावकर यांच्या सेवेसाठी. त्यांच्या जीपसह दिवसरात्र उपलब्ध राहणारे चालक बन्सीभाई शिकिलकर यांच्यासह डॉ. खटावकर अनेकदा रात्री अपरात्रीही कोणत्याही अडचणीसाठी तत्परतेने पोहोचत असत. वेळ–मर्यादा, हवामान, साधनसुविधा किंवा रुग्णाची आर्थिक परिस्थिती—या पैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या सेवाभावासमोर कधीच आड आली नाही.गेल्या पंधरा वर्षांपासून ते पुण्यातील गंगा धाम येथे वास्तव्यास होते. सुपे गाव सोडून पुण्यात आल्यानंतरही सुपे व परिसरातील अनेक रुग्ण आजारपणात त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. अलीकडील काही काळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे बाहेर जाणे बंद झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेली त्यांच्याशी शेवटची संवादाची आठवण मन हेलावून जाते.
त्यांच्या पश्चात डॉ. राजीव खटावकर आणि डॉ. नम्रता खटावकर ही त्यांची पुढील पिढी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून वडिलांचा सेवाभाव पुढे नेत आहे.
सुपे परिसराने एक संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ आणि निस्वार्थी वैद्यकीय सेवक गमावला आहे.
डॉ. सुरेश खटावकर यांना विनम्र श्रद्धांजली 🙏💐
