प्रतिनिधी फिरोज मोगल
34,वर्षांपासून फरार घरफोडी आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
लातूर | १० नोव्हेंबर २०२५लातूर पोलिसांच्या विशेष पथकाला मोठे यश मिळाले असून ३४ वर्षांपासून न्यायालय आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या घरफोडी प्रकरणातील आरोपी बालाजी हरीभाऊ सरवदे (वय ५८, रा. वालेनगर, लातूर; ह.मु. सेलू ता. औसा) यास अटक करण्यात आली आहे.
१९९१ साली कोल्हेनगर भागात झालेल्या घरफोडी प्रकरणात आरोपी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी फुलचंद सूर्यवंशी यांच्या घराचे कुलूप तोडून टेप रेकॉर्डर, सोन्याच्या काड्या, करदोरा, चांदीची चैन व जोड तसेच रु. ३,५८०/- रोख असा ऐवज चोरी केला होता. या प्रकरणी गुन्हा क्र. ५०/१९९१ कलम ४५७, ३८० भा.दं.वि. नोंदविण्यात आला होता.
घटनेनंतर आरोपीने सतत वास्तव्याचे ठिकाण बदलत पोलिस व न्यायालयापासून लपून राहत ३४ वर्षे फरार राहण्यात यश मिळवले होते. अखेर मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास ताब्यात घेऊन ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीस २२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही अटक लातूर पोलिसांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि गुन्हे शोध क्षमतेचे महत्वाचे उदाहरण ठरली आहे.
